Saturday, November 28, 2020

श्री स्वयंभू जत्रोत्सव

श्री स्वयंभू जत्रोत्सव


त्रिपुरारी   पौर्णिमा

केसरी हे सावंतवाडी तालुक्‍यातील सुमारे एक हजार वस्तीचे गाव आहे. वेंगुर्ला ते बेळगाव महामार्गावरील श्री सदगुरु  साटम महाराजांची समाधी स्थळ दाणोली पासून अवघ्या दोन किलोमीटर हे गाव आहे. हे गाव सह्याद्रीच्या पट्ट्यात असल्याने निसर्गाने गावावर सौंदर्याची मुक्तपणे उधळण केलेली आहे. गावाच्या चारही बाजूने डोंगराचा वेढा, घनदाट झाडी आणि बारमाही वाहणारे ओहो यांनी या गावचे सौंदर्य विलोभनीय केले आहे.

सुमारे शंभर वर्षाहून जास्त काळ सावंतवाडी शहराला याच गावातून पाणी पुरवठा केला जातो. हे पाणी सुद्धा पाईपलाईने गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधारे सावंतवाडीला पुरवले जाते. या तंत्रज्ञानात कोणत्याही पंपाचा वगैरे वापर केलेला नाही. या गावात एक पांडवकालीन गुहा आहे. या गावाचा इतिहास पांडवकालीन असल्याचे स्पष्ट होते.

श्री स्वयंभू देवाला देवसू, दाणोली व केसरी तीन गावचा देव सुद्धा म्हटले जाते. देवसू येथील श्री देवी शेंडोबा माऊली, दाणोली गावठाण येथील श्रीदेवी लिंग माऊली व केसरी येथील श्री देवी सातेरी श्रीदेवी व श्री देवीरलाई माता यांचे जत्रोत्सव तिन्ही गावातील सावंत समाज व इतर भक्त आनंदाने साजरा करतात.

त्रिपुरारी उत्सव


श्री स्वयंभूचा जत्रोत्सव हा त्रिपुरारी पौर्णिमेला साजरा केला जातो. त्या वेळी करलाई देवीला द्वादशीला दिवशी सवाद्य आणले जाते. द्वादशी दिवशी माहेरवाशिणी स्वयंभू मंदिराच्या पायरीवर देवीची ओटी भरतात. त्यानंतर द्वादशीला देवसू त्रयोदशीला दाणोली गावठाण, चतुर्दशीला केसरी गाव यांच्याकडून देवाची वेगवेगळ्या प्रकारे सेवा केली जाते. तसे पाहिले तर कोजागरी पौर्णिमेपासून देवाचा जागर केला जातो. त्यामध्ये पहिले पंधरा दिवस ग्रंथवाचन, आरती असा कार्यक्रम असतो तर उर्वरित पंधरा दिवस कीर्तने व पहाटे पालखी असा भरगच्च कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमासाठी कुळ घरातील एका व्यक्तीस एक महिना व व्रतस्थ राहावे लागते. जत्रोत्सव दिवशी संध्याकाळी या व्यक्तीच्या डोक्यावरील केस काढून चंदनाचा लेप लावून त्यावर दीचढवला जातो. 


नंतर या व्यक्तीच्या अंगात कुळाच्या पुर्वसाचा संचार असल्याने तबला व घंटीच्या ठेक्यावर ही व्यक्ती स्वयंभू समोर ताल धरून एका विशिष्ट प्रकारात नाचते. त्याला देवाची आरती असे संबोधले जाते. तिन्हीसांजेला हा कार्यक्रम होतो. नंतर हजारो पणत्या मंदिर परिसरात पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो. रात्री उपस्थित असलेले भाविक उपाशी राहू नये, म्हणून जेवणासाठी ताकीद दिली जाते. तसेच जेवणाची व्यवस्था केसरी ग्रामस्थ घरीच करतात. रात्री उशिरा कीर्तन व दशावतरी कलाकारांचे नाटक आदी कार्यक्रम होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सवाद्य पालखी मिरवणूकीने उत्सवाची सांगता होते.


आणखी एक वैशिष्ट म्हणजे फक्त स्वयंभू जत्रोत्सवात स्त्रियांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशाची मुभा आहे. श्री स्वयंभू देवस्थान हे बारा पाचाचे देवस्थान आहे. या देवस्थानाला महादेवाचे अधिष्ठान लाभलेले आहे. देवस्थान पुरातन आहे, मात्र इतिहासात याची नेमकी स्थापना मिळत नाही. मात्र, मंदिराच्या एका लाकडी खांबावर पुरातण शिलालेख असून त्यावर श्री खो. शा. शके १७४८ व्ययन का. श्रु त्र यो मे बाळहळू सेवा असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर श्री देवी करलाईचे छोटेसे पण सुंदर, मनमोहक मंदिर आहे. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी श्री देवी करलाईदेवीचा उत्सव भाविक भक्तिभावाने साजरा करतात. या गावाचा मूळपुरुष सावंत घर असल्याने सावंतांचे एक तरंग व श्री स्वयंभूचे एक तरंग अशी दोन तरंगे आहेत. महाशिवरात्र व नारळी पौर्णिमा, नवरात्र उत्सव, श्रावणातील सोमवार से अनेक उत्सव भक्तिभावाने मंदिरात साजरे केले जातात. केसरी गाव पर्यटन दृष्ट्या फार निसर्ग रम्य आहे. येणाऱ्या काळात या देवाचे महात्म असेच सर्वदूर पसरत राहो, ही स्वयंभू चरणी प्रार्थना..

संकलन : सुविधा सिताराम सावंत












No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.