Saturday, May 2, 2020

जिल्ह्यातील त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह

सिंधुदुर्गनगरी : अभय जाधव

जिल्ह्यात २९ एप्रिल रोजी आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. या युवतीच्या संपर्कात एकूण २८ व्यक्ती संपर्कात आल्या होत्या. त्यापैकी १६ व्यक्ती कमी जोखमीच्या संपर्कातील असून त्यांना घरी अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर अतिजोखमीच्या संपर्कातील १२ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या १२ सर्व व्यक्तीचे नमुने तपासणीसाठी पाठविलेले असून यापैकी ६ व्यक्तीचे निगेटिव्ह  आले आहेत. तर ६ व्यक्तीचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. सावंतवाडी येथे गरोदर महिलेला सोडण्यासाठी आलेली व्यक्ती कोल्हापूर येथे कोरोना बाधीत असल्याचे समजले. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून या सर्वांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच सदर गरोदर स्त्री व तिचे बाळ यांची प्रकृती उत्तम आहे. 
            जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव्ह रूग्णावर जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये  औषधोपचार सुरू करणेत आलेले आहेत. जनतेने याबाबत कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता सामाजिक अंतर ठेवून योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करणेत येत आहे.
जिल्ह्यात ४३९ व्यक्ती अलगीकरणात
आजमितीस जिल्ह्यात एकूण ४३८ व्यक्ती अलगीकरणात असून  त्यापैकी २९२ व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर १४७ व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
            जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण ४४० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ४०८ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ४०६ नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर अजून ३२ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या ६८ व्यक्ती दाखल असून त्यातील ४० व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये तर २८ व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण १९०३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.