कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता व लॉकडाऊन विषयक निर्णयांमध्ये सर्व नगरपालिकांमध्ये एकवाक्यता असावी, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या समवेत आज पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात बैठक घेतली.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी संतोष जिरगे यांच्या सह कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड, वैभववाडीचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
सर्व नगरपालिका क्षेत्रात शारिरीक अंतराचे पालन करून हॉटेलमध्ये टेक अवेची पार्सल सुविधा सुरू करावी असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. याची कारवाई आजपासून करावी. भाजी विक्रेते यांना एका ठराविक वेळी बाजारात बसवण्यात यावे, दुकानदारांनी दुकान कशासाठी उघडले आहे याचीही चौकशी प्रत्यक्ष करावी, दंड आकारताना त्या विषयी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करावी, कोणत्याही प्रकारची कारवाई कायद्यानेच करावी, शासनाच्या सूचनांनुसारच सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत, त्याशिवाय इतर कोणतीही दुकाने सुरू राहणार नाहीत, कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना नगराध्यक्षांशी चर्चा करावी. नगरपालिका क्षेत्रात होणारे निर्णय व कामे यांचा अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी यांना पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.
बेळगाव येथील भाजी बंद राहणार
बेळगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे बेळगावयेथून येणारी भाजी पूर्णत: बंद ठेवावी. याविषयी सर्व मुख्याधिकारी यांनी याविषयी निर्णय घ्यावा. जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सोबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा. ३ तारखेपर्यंत जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवा व शासनाने सांगितलेल्या सेवाव्यतिरिक्त कोणासही सुट मिळणार नाही. मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयापेक्षा वेगळे निर्णय घेऊ नयेत अशा सुचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी दिल्या.
यावेळी पालकमंत्री श्री. सामंत यांनी नगरपालिका क्षेत्रातील सुरू असलेली कामे व नगरोत्थान मधील निधी व कामे. राष्ट्रीय महामार्गाचे काम व जिल्ह्यातील महत्वाच्या रस्तेकामांचा ही आढावा घेतला.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.