लॉकडाऊनचा असाही सदुपयोग.....
दाम्पत्याने खोदली चक्क २५ फुट खोल विहीर...
टिम KONKAN मिरर वाशिम:-
कोरोनामुळे संपूर्ण देशात आणि राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकजण घरी अडकून बसला आहे. घरी बसून काय करायचे असा सवाल प्रत्येकाल सतत सतावत आहे. मात्र या मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याचे उत्तम उदाहरण वाशिमच्या पाकमोडे दाम्पत्याने आपल्या कर्तृत्वाने करून दाखवले आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावातील एका दाम्पत्याने संधीचं सोनं केलं आहे. पाकमोडे दाम्पत्याने आपल्या घराच्या अंगणात चक्क २५ फूट विहीर खोदली आहे. रिकाम्या वेळात आपल्या कुटुंबाला नेहमीच भेडसावणारा पाणी प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय या दाम्पत्याने घेतला आणि त्यांच्या कार्याला यश देखील आलं.
वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेड गावात गजानन पाकमोडे आणि पुष्पा पाकमोडे राहतात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मोकळा वेळ खूप होता. या रिकाम्या २१ दिवसात त्यांनी आपल्या घरासमोरील अंगणात चक्क २५ फूट विहीर खोदण्याची किमया साधली. गजानन पाकमोडे हे गवंडी काम करुन आपला प्रपंच चालवतात.
गावात नळ योजना आहे, मात्र रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असल्याने नळ योजनेची पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवत होता. तो निकाली काढण्यासाठी पाकमोडे दाम्पत्याने कुणाचीही मदत न घेता विहीर खोदून काढली. आपल्या मेहनतीने त्यांनी जणू गंगाच आपल्या दारी आणली. या दाम्पत्याने केलेल्या कार्याचं आता गावात कौतुक होत असून त्यांची विहीर पाहण्यासाठी नागरिक येत आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.