आपल्या अभिनयाच्या जादूने फक्त बॉलीवूडवर नव्हे तर हॉलीवूडला सुद्धा चकित करणारा रंगकर्मी इरफान खान याचे आज आज सकाळी निधन झाले. मंगळवारी त्यांना आतड्यांच्या इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होते.
०७ जानेवारी १९६७ रोजी जयपूर येथे इरफान खान यांचा जन्म झाला. बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील एक सक्षम अभिनेते अशी त्यांची ओळख होती. गुणवत्ता आणि क्षमता असूनही या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी इरफान खान यांना बरीच मेहनत करावी लागली.
त्यांचा आयुष्य जगण्याचा संघर्ष फार मोठा होता. एका मुस्लिम पठाण कुटुंबात इरफानचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव साहबजादे इरफान अली खान असे होते. इरफान यांच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. इरफान यांना जेव्हा ‘एनएसडी’मध्ये प्रवेश मिळाला, त्याचदरम्यान त्यांचे वडील गेले. त्यानंतर त्यांना घरच्यांकडून पैसे मिळणं बंद झालं. ‘एनएसडी’कडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीवर त्यांनी कोर्स पूर्ण केला.
इरफान खान यांनी त्याच्या करिअरमध्ये एकाहून एक सरस सिनेमे दिले. बॉलिवूडप्रमाणे ते हॉलिवूडमध्येही सक्रिय होते. त्यांनी हॉलिवूडमधील ‘स्पायडर मॅन’, ‘जुरासिक वर्ल्ड’ आणि ‘इन्फर्नो’ या सिनेमांमध्ये काम केलं. ‘इरफानचे डोळेही अभिनय करतात,’ असं कौतुक एका मुलाखतीत हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्सने केलं होतं.
इरफान खान यांनी २००५मध्ये रोग या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हासिल या चित्रपटासाठी इरफान यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर इरफान यांनी ‘लंचबॉक्स’, ‘गुंडे’, ‘हैदर’, ‘पीकू’ आणि ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. ‘पानसिंह तोमर’ सिनेमासाठी इरफान यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. २०११मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
इरफान खान यांनी त्यांची वर्गमैत्रीण सुतपा सिकंदरशी १९९५मध्ये लग्न केलं. इरफान यांच्या वाईट काळामध्ये सुतपा सिकंदर त्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. २०१८मध्ये इरफान यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. उपचारांसाठी ते लंडनला गेले होते. एक वर्ष उपचार घेतल्यानंतर बरे होऊन इरफान भारतात परतले होते. त्यानंतर त्यांनी इंग्लिश मीडियम या चित्रपटाचे कामही पूर्ण केले. तो चित्रपट अलीकडेच भारतात प्रदर्शित झाला होता.
दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या आई सईदा बेगम (वय ९५) यांचं निधन झालं होतं; मात्र लॉक डाऊनमुळे बाहेर पडता न आल्याने त्यांना आईचं अंत्यदर्शन व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. मंगळवारी (२८ एप्रिल) इरफान यांना आतड्याच्या इन्फेक्शनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.