Wednesday, April 29, 2020

मद्यासह अन्य अंमली पदार्थांच्या विक्रीस परवानगी देऊच नका...

जीवमंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल...

टिम KONKAN मिरर:-पुणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने बंद असलेली दारूची दुकाने, वाईन शॉप व बियर बार सुरु करण्याची मागणी काही नेतेमंडळी करीत आहेत. सरकारकडूनही याबाबत चाचपणी सुरू आहे. मात्र, कोरोनाचे गंभीर संकट व सामाजिक आरोग्य लक्षात घेऊन मद्यासह अन्य तंबाखू, सिगारेट व अन्य अंमली पदार्थांच्या विक्रीला परवानगी देऊ नये, असे आवाहन पुण्यातील सर्व जीवमंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी केले आहे.

केंद्र व राज्य सरकारला ईमेलद्वारे निवेदन देऊन डॉ. कल्याण गंगवाल यांनी ही मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्षराज ठाकरे व अभिनेते ऋषि कपूर यांनी दारूची दुकाने सुरू करण्याबाबत सरकारकडे मागणी केली होती. शाकाहार, व्यसनमुक्ती, जीवदया यासाठी डॉ. कल्याण गंगवाल गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दीड महिन्याचे लॉकडाऊन लागू केले. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने, उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. व्यसनमुक्तीच्या दृष्टीने या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम झाला आहे. अनेकांची दारू सुटली आहे. माझ्याकडे येणाऱ्या अनेक रुग्णांनी व्यसन सुटल्याचे फोन करून कळवले आहे. दारू, तंबाकू, सिगारेट मिळत नसल्याने त्याचे सेवन करण्यासाचे प्रमाण लक्षणीय घटले आहे. परिणामी, घरातील महिलांवर होणारे हिंसाचार, गावागावातील भांडणे, खून, मारामाऱ्या, चोऱ्या आदी गुन्हे थांबले आहेत. सामाजिक आरोग्य सदृढ होताना पाहायला मिळत आहे.

अशावेळी पुन्हा दारूची दुकाने उघडली गेली, तर लोक गर्दी करतील. ‘फिजिकल डिस्टनसिंग’ पाळले जाणार नाही. कोरोनाचा धोका वाढेल. यासह ज्यांची व्यसने सुटली आहेत. त्यांना पुन्हा मद्यपान करण्याची इच्छा होईल. परिणामी, समाजातील वातावरण पुन्हा बिघडेल. नवरा-बायकोची भांडणे, गतागटातील भांडणे वाढतील. खून, मारामाऱ्या, चोऱ्या होतील. तेव्हा व्यसनमुक्त होऊ इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी दारूची दुकाने सुरु करून त्यांना त्यात ढकलणे योग्य नाही. तसेच त्यामुळे उद्भवणाऱ्या इतर प्रश्नांचा विचार करून दारूच्या दुकानासह इतर अंमली पदार्थांची विक्री करण्यास केंद्र व राज्य सरकारने परवानगी देऊ नये, असे आवाहन करत असल्याचेही डॉ.कल्याण गंगवाल यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.