Tuesday, April 21, 2020

सिंधुदूर्ग जिल्ह्यात फक्त १ रूग्ण असताना,अद्याप पर्यंत "ऑरेंज झोन" मध्येच हे पालकमंत्र्यांचेच अपयश....!

मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची टिका
कुडाळ:- संजोग जाधव

संपूर्ण देशात कोरोना विषाणू आपत्तीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले असताना जिल्ह्यातील जनतेने या आदेशांचे अगदी प्रामाणिकपणे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सर्वोत्तपरी सहकार्य केले. ज्याचे फलित सिंधुदुर्गात एकमेव कोरोनाग्रस्त आढळून सुद्धा त्याचा संसर्ग इतरत्र होऊ शकला नाही. सदर व्यक्ती कोरोनापासून मुक्त होऊन घरी देखील गेला, मात्र जिल्ह्यात सद्यस्थिती एकही रुग्ण नसताना सुद्धा आपला जिल्हा शासकीय पटलावर "ऑरेंज झोन" मधेच अडकून आहे. हे निष्क्रिय पालकमंत्र्यांचेच अपयश आहे. अशी टिका मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली आहे.

वास्तविक आपला जिल्हा 'ग्रीन झोन' मध्ये असणे आवश्यक असताना अनेक दिवस उलटून देखील परिस्थिती जैसे थेच राहते. याचा नेमका अर्थ काय होतो..? संपूर्ण संचारबंदीत काही अपवाद वगळले तर जिल्हा प्रशासनातील सर्वच विभागांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. तरीसुद्धा पालकमंत्री उदय सामंत वरचेवर आढावा बैठका नेमक्या कशासाठी घेतात आणि त्यातून साध्य काय होत हे त्यांनाच माहीत...! केंद्र सरकारकडून २० एप्रिल पासून संचारबंदी काही अंशी शिथिल करण्याच्या लिखित सूचना प्राप्त होऊन देखील आपल्या जिल्ह्यात लोंकांमध्ये संभ्रवस्था याच पालकमंत्र्यांनी निर्माण करून ठेवली आहे. असे स्पष्ट मत प्रसाद गावडे यांनी मांडले आहे.
याकाळात आपल्या योग्य मार्गदर्शनाची जिल्हावासीयांना गरज असताना मात्र पालकमंत्री काहीही स्पष्ट बोलायला तयार नाहीत. राज्य सरकार अत्यावश्यक सेवांसाहित उद्योगधंदे, माल वाहतूक चालू करण्याची परवानगी देते आणि आपल्याकडे पोलीस प्रशासन रस्त्यावर गाडी दिसल्यास कारवाई करू अशी अलौन्सिंग द्वारे प्रसिद्धी करते, हे परस्पर भिन्न नाही का...? असा सवाल प्रसाद गावडे यांनी केला.
राज्य सरकार व जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्याचे हे द्योतक आहे. बेळगाव, कोल्हापूरहुन येणाऱ्या भाजीपाल्यास मज्जाव करावा, व स्थानिक गावठी भाजीपाला विक्रीस प्रोत्साहन द्यावे, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर नुसत्या नोटिसा न देता शिस्तभंगप्रकरणी कठोर कारवाई करून आदर्श उदाहरण स्थापित करावे, अशी प्रसाद गावडे यांची मागणी आहे.
याचबरोबर उलट सुलट प्रसिद्धी देऊन जनतेला संभ्रमित करू नका, अशी जिल्हा प्रशासनाला कळकळीची विनंती तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.