Wednesday, May 20, 2020

जिल्ह्यात १० नवीन पर्जन्यमापन केंद्र सुरू करणार त्यासाठीचे २५ लाख रुपये जिल्हा नियोजनमधून देणार - पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी : उमेश जाधव

जिल्ह्यातील सद्यस्थितीत असलेली पर्जन्यमापन केंद्र ही महसूल अर्थात तहसिलदार कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आता आणखी १० नवीन पर्जन्यमापन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारा २५ लाख रुपयांचा निधी हा जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. येथील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहामध्ये आज खरिब हंगाम २०२० पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. बागल, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते. 
खरिप हंगामासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खतांचे नियोजन करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, बियाणांचे वाटप तातडीने सुरू करावे, विविध कार्यकारी संस्था मार्फत तसेच जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या महिला बचत गटांमार्फत बियाणांचे वाटप करावे. सुवर्णा बियाणे तातडीने मागवून १५ जून पर्यंत  वाटप करण्याचे नियोजन करावे, ३५ हजार ६० शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळावा, महसूल ऐवजी कृषि अधारीत सर्कल असावे, तरच त्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल, कृषि नुकसानीचे पंचनामे वेळेत व तातडीने करावेत, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.
यंदाच्या खरिप हगामात ६१ हजार ९३० हेक्टर क्षेत्रावर परणीचे उद्दीष्ट निर्धारित केले आहे. तर रब्बी हंगामासाठी १७ हजार १८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा लक्षांक निर्धारित केले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगाम तसेच यंदाच्या खरीप हंगामाचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. 
यंदाच्या खरिप हंगामासाठी भात – ५९ हजार २३० हेक्टर, नागली १ हजार ५२० हेक्टर, इतर तृण धान्य ६५ हेक्टर, कडधान्य २३० हेक्टर, तेलबिया ६१० हेक्टर या प्रमाणे लक्षांक निर्धिर केला आहे. रब्बी हंगामासाठी तृणधान्य ४९० हेक्टर, उन्हाळी भात १ हजार ६५० हेक्टर, कडधान्य ५ हजार हेक्टर, गळित धान्य ९५ हेक्टर, भूईमूग ३ हजार २०० हेक्टर, भाजीपाला ४ हजार ५०० हेक्टर, ऊस २ हजार २५० हेक्टर या प्रमाणे लक्षांक निर्धारित केला आहे. 
यंदाच्या खरिप हंगामासाठी भाताच्या बियाणांची एकूण मागणी ७ हजार ८०४ क्विंटल इतकी असून त्यामध्ये ७ हजार १९९ क्विंटल सुधारित तर ४०० क्विंटल संकरीत वाणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बियाणे बदलाचे प्रमाण ३० टक्के गृहीत धरून खरीप २०२० साठी ७ हजार ८०४ क्विंटल बियाने वितरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खरीप हंगामासाठी १८ हजार २८५ मे.टन रासायनिक खतांची मागणी आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.