Friday, May 8, 2020

कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे महत्वाचे - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : अमीत तेंडोलकर

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून तसेच जनतेला कोव्हीड-१९ बाबत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने आरोग्य सेतू हे ॲप तयार केले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सदर ॲप अत्यंत उपयुक्त असून हे ॲप डाऊनलोड करणे महत्वाचे असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करावे व कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
          हे ॲप ब्लुटुथ तंत्रज्ञानावर अधारित असून ॲन्ड्रॉईड व आयओएस प्रणालीच्या भ्रमणध्वनीवर चालते. ११ भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे. याद्वारे कोव्हीड-१९ बाधीत रुग्णांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माहितीच्या आधारे जी.पी.एस. तंत्रज्ञानाद्वारे कोरोना बाधीत रुग्ण जवळपास असल्यास वापरकर्त्यास धोक्याची सूचना देते. कोव्हीड-१९च्या स्वचाचणीची सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना, शारिरीक अंतर पाळणे व प्रतिबंधसाठी काय करावे व काय करू नये याची माहिती वापरकर्त्याला मिळते. स्वचाचणीत वापरकर्ता अतिधोकादायक स्थितीत आढळल्यास या ॲपद्वारे जवळच्या कोरोना तपासणी केंद्राचा क्रमांक उपलब्ध करून दिला जातो किंवा तात्काळ १०७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या जातात. वापरकर्त्याच्या सर्वसाधारण प्रश्नांची प्रमाणित उत्तरे दिली जातात. सर्व राज्यातील हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करुन दिले जातात. लॉकडाऊन काळात वापरकर्त्यास अपरिहार्य परिस्थितीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकामी जाण्याची आवश्यकता असल्यास ई पास उपलब्ध होतो.
             हे ॲप पुढील लिंकवर डाऊनलोड करून घेता येते. ios – itms-apps://itunes.apple.com/app/id505825357 व  Android : https:/play.google.com/store/appes/details?id= nic.goi.arogyasetu. थोडक्यात आयओएस मोबाईल धारक त्यांच्या आयट्युन्स मधून व ॲन्ड्रॉईड धारक गुगल प्ले स्टोअर मधून हे ॲप डाऊनलोड करून घेऊ शकतात.
आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातून वापरकर्त्यास धोक्याची सूचना, स्वमुल्यांकन चाचणी, तसेच कोव्हीड-१९ पासून बचाव करण्याचे उपाय, शिक्षण मिळत असल्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी या ॲपचा वापर करणे महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, याकरिता सबंधित कार्यालय प्रमुख जबाबदार राहतील. परराज्यातून, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी तपासणी नाक्याजवळच सदर ॲप डाऊनलोड करून घ्यावे. तपासणी पथक प्रमुखांनी संबिधातांना तशा सूचना द्याव्यात. कोव्हीड-१९ बाधीत रुग्ण, अलगीकरण कक्षातील सर्व रुग्ण, संस्थात्मक विलगीकरण, गृह विलगीकरण करण्यात आलेले सर्व संशयित बाधीत रुग्ण, रुग्णालयातील डिस्चार्ज मिळालेले बाधामुक्त नागरिक तसेच आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी यांनीही जनहितार्थ हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करण्याबाबतच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व संबंधितांना द्याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.