कर्नाटकातील १ हजार ४४० मजूर रवाना
सिंधुदुर्गनगरी : अमीत तेंडोलकर
घरी जाण्याची लगबग, आप्तेष्टांना भेटण्याची ओढ, गावी जायला मिळणार म्हणून लहानग्यांचा सुरू असलेला किलबीलाट, प्रवासाचा उत्साह, डोक्यावर संसाराचे ओझे घेऊन घरच्या ओढीने सुरू असलेली धावपळ, त्यातच या सर्वांना शिस्तीत, सामाजिक अंतर राखत रेल्वेत बसवण्याची प्रशासनाची व पोलिसांची धडपड, प्रवाशांना खाद्यान्नांची पाकीटे वाटण्याची स्वयंसेवकांची शिस्तबद्ध घाई, लॉकाडाऊनमुळे गेले दोन महिले शांत असलेल्या सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्टेशनला आलेली जाग असे चित्र होते आज सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशनवरील.
निमित्त होते जिल्ह्यातून सुटणाऱ्या पहिल्या श्रमिक विशेष रेल्वे गाडीचे.
जिल्ह्यात अडकलेल्या मजूर, कामगार यांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे आज पहिली श्रमीक विशेष रेल्वे कर्नाटकातील विजापूरकडे रवाना झाली. जिल्ह्यातून एकूण १ हजार ४४० मजूर व कामगार या रेल्वेने त्यांच्या गावी रवाना झाले. यावेळी मजूरांच्या चेहऱ्यावर समाधान व गावी जाण्याचा आनंद दिसून येत होता.
सिंधुदुर्गनगरी येथून सुटलेली ही रेल्वे मडगाव व हुबळी स्थानकात थांबा घेऊन विजापूर येथे पोहचणार आहे. यावेळी प्रवाशांना ल्युपीन फौन्डेशनच्या माध्यमातून पाण्याची बाटली, मास्क, साबन व फुड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.
गेले दोन महिने कोरोनाच्या सावटाखाली वावरल्यावर आज स्वतःच्या गावी जाण्यासाठी रेल्वेसमोर दिसली आणि जीव भांड्यात पडला, आता आम्हाला घरी जायला मिळणार यासाठी जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार अशी भावना विजापूर जिल्ह्यातील हरीष चव्हाण यांनी व्यक्त केली. बदामी जिल्ह्यातील शेखर कमतर म्हणाले, पोटापाण्यासाठी आमचा गाव सोडून आम्ही आमच्या ५ कुटुंबासह जिल्ह्यात आलो. गेली तीन वर्ष चांगली गेली. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे आम्ही धास्तावलो होतो. गावाकडे जाता येईल का नाही ही भिती मनात होती. महाराष्ट्र सरकारने आम्हाला रोजगार दिला आणि आता आम्हाला गावी जाण्यासाठी मोफत रेल्वेची सोय केली. महाराष्ट्राच्या मातीला आम्ही कदापीही विसरणार नाही. या मातीचे आमच्यावर खूप उपकार आहेत. महाराष्ट्राला माझा नमस्कार व जिल्हा प्रशासनाचे अनंत अभार.
जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १ हजार ४४० कामगार व मजुरांना दुपारपर्यंत एस. टी. बसमधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकामध्ये आणण्यात आले. कुडाळ तालुक्यातील ३५९ व्यक्ती १८ बसगाड्यांमधून, देवगड तालुक्यातील ३७१ व्यक्ती १८ गाड्यांमधून, मालवण तालुक्यातील ३०७ व्यक्ती १५ गाड्यांमधून, कणकवली तालुक्यातील २३५ व्यक्ती १३ गाड्यामंधून, सावंतवाडी तालुक्यातील २५ व्यक्ती १ गाडीमधून तर वेंगुर्ला तालुक्यातील ७१ व्यक्ती ४ गाड्या अशा एकूण ६९ एस.टी बस मधून सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकात आणण्यात आले. यावाहतूकीवेळी सामाजिक अंतराचे योग्य ते पालन करण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन करत या सर्वांना त्यांची तिकीटे देत रेल्वेमध्ये आसनस्थ करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, कुडाळच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे, कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे, तर कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक टी. मंजुनाथ, रेल्वे पोलीस दलाचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सतीशन व्ही.व्ही., स्टेशन मास्तर वैभव दामले यांच्यासह सर्व तालुक्यांचे तहसिलदार आदी उपस्थित होते.
रेल्वेमध्ये प्रवासी बसत असताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांची बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकूणच पूरष, महिला, लहान मुले, वृद्ध आणि अपंग यांची घरी जाण्यासाठीची मोठी लगबग या ठिकाणी पहावयास मिळाली.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.