Thursday, April 30, 2020

पोईप येथील रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द

विशेष प्रतिनिधी : असीम वागळे
शिधापत्रिका धारकांच्या गैरहजेरीमध्ये अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्या प्रकरणी मालवण तालुक्यातील पोईप येथील विकास सोसायटीचे अध्यक्ष यांच्या नावे मंजूर करण्यात आलेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.
या प्रकरणी पोईप येथील रास्त भाव धान्य दुकानामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मालवण तहसिलदार यांना चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याविषयी कळविले होते. सदर चौकशीमध्ये सदर दुकानामध्ये गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याचे अहवालात म्हंटले आहे. तसेच या धान्य दुकानाच्या व्यवहाराबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून तसेच शासन निर्णयातील  तरतुदींनुसार सदर धान्य दुकानाचा परवाना निलंबित केला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.