Tuesday, April 21, 2020

शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख विक्रांत सावंत यांचा पलटवार

जनतेच्या आत्मीयतेनेच खासदार जिल्हा दौऱ्यावर;परब यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलावे.

शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख विक्रांत सावंत यांचा पलटवार

सावंतवाडी:- असीम वागळे

सावंतवाडी: कोकणातील लोकांशी असलेल्या आत्मीयतेमुळे खासदार विनायक राऊत सिंधुदुर्गात आले आहेत. यासाठी आवश्यक आरोग्य तपासण्या झाल्यानंतरच त्यांना मुंबईतून प्रशासनाने सिंधुदुर्गात प्रवेश दिला. त्यामुळे अपुर्‍या माहितीच्या आधारे सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी लहान तोंडी मोठा घास घेवून,आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन घडवू नये,असे प्रत्युत्तर शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत यांनी पत्रकातून दिले.नगराध्यक्ष परब यांनी श्री. राऊत आणि अतुल रावराणे हे शिवसेना नेते मुंबईतून सिंधुदुर्गात येवून फिरत असल्याबाबत पत्रकार परिषद घेवून आक्षेप नोंदवला होता.
याला श्री. सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, परब यांनी अपुर्‍या माहितीच्या आधारे खोटे दावे करू नयेत. श्री. राऊत हे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. ते मुंबईमध्ये होम कॉरन्टाईन कालावधी पूर्ण करून आवश्यक आरोग्य तपासण्या करूनच सिंधुदुर्गात आले आहेत. निकष पूर्ण केल्यानंतरच प्रशासन त्यांना मुुंबई सोडण्यास परवानगी देवू शकणार हे परब यांना समजू नये हे दुर्दैवी आहे. श्री. राऊत कोकणातील जनतेच्या सुख-दुखःशी एकरूप झाले आहेत. लोकांशी असलेल्या आपुलकीच्या नात्यामुळेच ते सिंधुदुर्गात आले आहेत. येथील प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करून सिंधुदुर्गात कोरोनाचे संकट येवू नये यासाठी ते रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत.
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हेही आरोग्य ठीक नसतानासुध्दा सिंधुदुर्गात स्थितीचा आढावा घेण्यासाठी येवून गेले.अतुल रावराणे हेही आवश्यक वैद्यकीय तपासण्या करूनच जिल्ह्यात आले आहेत. यामुळे परब यांनी नाहक आरोप करून आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन घडवू नये, असेही यात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.