Monday, May 4, 2020

शॉपिंग कॉम्पलेक्समधील दुकाने वगळता सर्व दुकाने सुरू राहणार - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा सध्या ऑरेंज झोन मध्ये आहे. प्रत्येक झोन विषयी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा प्रशासन निर्णय घेत असून आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी असणार आहे. तर शहरी भागात निवासी संकुलातील व एकटी असणारी सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी आहे. सुरू राहणाऱ्या दुकानांमध्ये मद्यविक्रीच्या दुकानांचाही समावेश असणार आहे. या सर्व दुकानदारांनी शारिरीक अंतर ग्राहकांकडून योग्य पद्धतीने पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी. तसेच कोरोना संदर्भात घ्यावयाच्या सर्व दक्षता घेऊन व्यवहार करावयाचे असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. 
            जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, विद्यार्थी, कामगार यांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत राज्यस्थानमधील १२९ मजूर व कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. हे सर्वजण त्यांच्या स्वतःच्या वाहनाने प्रवास करणार आहेत. तर आंध्र प्रदेश येथील भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेचे ११ जण जिल्ह्यात अडकले होते. त्यांनाही हैदराबाद येथे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर जवाहर नवोदय विद्यालयाचे मुळच्या उत्तरप्रदेशमधील २८ विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
    जिल्ह्यात अडकलेल्या व मुळ गावी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या अशा दोन्ही लिंकवर संपर्क साधावा. परवानगी मिळताच या  सर्वांना त्यांच्या मुळ गावी रवाना करण्यात येणार आहे. तर गोवा राज्यात अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यक्तींना जिल्ह्यात परत आणण्यासाठीचा प्रस्ताव गोवा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यास मंजूर मिळाल्यानंतर सदर व्यक्तींना जिल्ह्यात परत आणण्यात येणार आहे. याशिवाय हॉटस्पॉट वगळून परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले जिल्ह्यातील जे लोक जिल्ह्यात परत येऊ इच्छितात त्यांच्याविषयीचे प्रस्तावही संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.