Tuesday, May 12, 2020

कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील सर्वांचा शोध पूर्ण

वाडा देवगड येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील सर्वांचा शोध पूर्ण - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : पवन मेहत्तर

देवगड तालुक्यातील वाडा येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. एकूण ३६ व्यक्ती या रुग्णाच्या संपर्कात आल्या असून त्यातील ११ व्यक्ती या अतिजोखमीच्या संपर्कातील तर २५ व्यक्ती या कमी जोखमीच्या संपर्कातील आहेत. अतिजोखमीच्या संपर्कातील ११ व्यक्तींपैकी २ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून आणखी ७ व्यक्तींचे नमुने आज घेण्यात येणार आहेत. २ व्यक्तींचे नमुने उद्या घेतले जातील.  अतिजोखमीच्या सर्व व्यक्तींना अलगीकरणात ठेवण्यात आले असून, कमी जोखमीच्या व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
५१ वर्षीय कोरोना बाधीत महिला सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे. सदर महिलेच्या कुटुंबतील ६ व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले असून  वाडा, ता. देवगड येथे ३ किलोमीटरचा परिसर कन्टेन्मेंट झोन करुन या परिसरातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
           सदर रुग्णाचा मुलगा याने दिनांक २० एप्रिल ते ५ मे दरम्यान मुंबई येथे आंबा वाहतुक करुन व्यवसाय केला आहे. लक्षणे जाणवू लागल्यामुळे सध्या बाधीत झालेली महिला, तिचा मुलगा व सून यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी मुलगा व सून यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून फक्त या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  सदर महिला ही तिच्या मुलाच्या संपर्कात आल्यामुळे बाधीत झाल्याचे दिसून येते.
सध्या जिल्ह्यात एकूण ९६४ व्यक्ती अलगीकरणात असून ७४७ व्यक्ती गृह अलगीकरणात तर ३१७ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण ८१९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी ८१३ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ५ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरीत ८०८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अजून ६ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ६३ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ६०५८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या ५ कोरोना बाधीत रुग्णांपैकी  तीन रुग्णांवर विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. तर इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी सुमारे ४०० पास मंजूर करण्यात आले आहेत. तर या पासच्या माध्यमातून सुमारे ११०० व्यक्ती जिल्ह्याबाहेर जाणार आहेत. तर परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ३ हजार १७६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
    तसेच राज्याबाहेर जाण्यासाठी १८ हजार २७४ व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. नोंद केलेल्यांची यादी संबंधित राज्यातील नोडल अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे. तसेच परराज्यात जाणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या संबंधीत राज्याच्या लिकंवर जाऊन नोंदणी करून पास प्राप्त करुन घेण्याविषयी संबंधित राज्य शासनांनी कळविले आहे. त्या बाबतच्या लिंकची माहिती संबंधित राज्यांनी जिल्हा प्रशासनास कळविली आहे. तसेच ही माहिती पास मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये एस.एम.एस.च्या माध्यमातून कळविण्यात आली आहे. तसेच १२ हजार ७६२ व्यक्तींची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून संबंधीत राज्य  शासनांना त्यांना प्रवेश देण्याविषयी कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.