Friday, March 20, 2020

एमटीडीसीच्या रिसॉर्टवर शिवसेनेची धडक ; पर्यटन स्थळ बंद करण्याची मागणी

'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर रिसॉर्ट सुरू ठेवल्याप्रकरणी पालकमंत्री, तहसीलदार यांच्याकडे तक्रार

कोरोना (कोव्हीड १९) या विषाणूची पसरत असणारी पार्श्वभूमी त्यामुळे देशासह राज्यात युद्धपातळीवर खबरदारीच्या उपाययोजना सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वत्र हॉटेल, रिसॉर्टही बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी १८ मार्चला दिले आहेत. मात्र शासनाची अंगीकृत संस्था असलेल्या एमटीडीसीचे तारकर्ली येथील पर्यटन केंद्र सुरू असल्याने ग्रामस्थ संतप्त बनले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या ठिकाणी धडक देत हे रिसॉर्ट तातडीने बंद करण्याची मागणी केली. मात्र वरिष्ठांकडून अद्याप रिसॉर्ट बंद करण्याबाबत सूचना आल्या नसल्याचे हतबल असे उत्तर येथील अधिकाऱ्यांनी दिले. याबाबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह तहसिलदारांचे लक्ष वेधण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी यांनी ग्रामस्थांसोबत तारकर्ली एमटीडीसी कार्यालयावर धडक देत व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांना जाब विचारला. यावेळी उपशहरप्रमुख किसन मांजरेकर, प्रसाद आडवणकर, शाम झाड, सुशील तारी उपस्थित होते. शासनाने बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना रोखण्याची अथवा माघारी पाठवण्याची भूमिका घेतली असताना पुणे येथून एमटीडीसी मध्ये पर्यटक येतातच कसे? सर्व पर्यटन व्यवसाय बंद बाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले असताना आपल्याला त्याचे काहीच देणेघेणे नाही का? अशी विचारणा बबन शिंदे यांनी केली. पर्यटकांना माघारी पाठवत एमटीडीसी बंद ठेवा, अशी मागणी शिंदे, जोगी यांनी केली. एमटीडीसी बंद ठेवा याबाबत जिल्हाधिकारी अथवा वरिष्ठ कार्यालयातून आम्हाला कोणतेही लेखी आदेश नाहीत. मात्र आम्ही पर्यटकांची तपासणी करून प्रवेश घेतो. अनेक बुकिंग रद्द झालेत मात्र काही पर्यटक येतात सध्या पुणे येथील सहा पर्यटक दोन रूम मध्ये आहेत. अशी माहिती एमटीडीसी व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली. तसेच आमचा वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा सुरू असून आदेश मिळताच, एमटीडीसी बंद केली जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सर्व हॉटेल, रिसॉर्ट बंद असताना एमटीडीसी सुरू असल्याने बबन शिंदे यांनी याबाबत तक्रार तहसीलदार मालवण व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. याबाबत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचेही लक्ष वेधले जाणार असून एमटीडीसी तात्काळ बंदची मागणी करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आता प्रशासन स्तरावर कोणती कारवाई होते याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.