मैत्री - गौरी धुरी

 मैत्री      -     गौरी धुरी

.............................................................

जगातलं सर्वात सुंदर नातं म्हणजे मैत्री. मैत्रीसारखं निरागस आणि खरं नातं माणसाच्या आयुष्यात दुसरं नातं नाही हे आपण सर्वजणच मान्य करतो. कोणत्याही नात्याचे बंध आधी मैत्रीनेच विणले जातात, बांधले जातात. मैत्रीचे जितके कौतुक करावे वर्णन करावे तेवढे थोडेच !!

मैत्री आपली साथ जिवनाच्या वाटेवर कधी अंधार असु दे की प्रकाश, सुख असो अथवा दु:ख 

ती आपली साथ सोडत नाही कधी.आपण चुका केल्या वाईट वागलो तरी मैत्री कधीच रुसत नाही राग धरत नाही उलट ती आपल्याला सावरण्यासठी हात देते, दिलासा देते सावली देते.

आपल्या गुणदोषांसहीत स्वीकारते.



आपल्या मनाचे सुख दु:ख आपले मनमीत ज्याच्याशी बोलावे शेअर करावे असा एक तरी मित्र असावा आपला. आणि असतोही तो. आजच्या जगाच्या या बदलत्या आणि कोसळत्या नाते संबंधात मैत्री हे नातं आजही अढळ आणि निखळ आहे झऱ्यासारखे. 

मैत्रीत शब्दाविणाही आपले मन दोन मित्र ओळखतात. एकमेकांना एकमेकांचे मन कळलेले असते, आकळलेले असते. आणि ती दोन मने जगाचे कुठलेही स्वार्थी भाव बंध भेद न मानता एकमेकास समरसुन समर्पित झालेली असतात, अशी मैत्रीच अमर असते.


कोणत्याही नात्याचा प्राण मैत्री असेल तर इतर सारी नाती अधीक सोपी होतात निभावताना.

अर्थात मैत्री प्रत्येक नाते अधीक नितळ बनवु शकते. मात्र अशी मैत्री कधीही मागुन मिळत नाही. ती विश्वासाच्या बळावर मिळवावी लागते व विश्वासानेच टिकवावी लागते.


जगाने खुप मोठ्या आदर्श मैत्रीच्या कथा ऐकल्या आहेत.

मैत्रीसाठी प्राण पणालाही लावणारे वेडे मित्र असतात.

मैत्री कोणतीच बंधने. भेदभाव मानीत नाही. तिचा जन्मच मुळात निरागस असतो.


मैत्री ना गरीब श्रीमंत भेद मानते ना स्त्री पुरुष ना जात धर्म..

मैत्री पाण्यासरखी प्रवाही आणि पवित्र असते. आणि म्हणुनच ती सर्व नात्यांत श्रेष्ठ आहे नेहमीच.


मैत्री जगायला शिकवते, ज्यानी ती कमावली ते भाग्यवानच.. 

मैत्री जगण्याचं कारण बनते. आयुष्याला नवं वळण देते. ज्याला ज्याला या नात्यातली गम्मत गोडी माया मित्रप्रेम मिळाली तो जगातला सर्वात श्रीमंतच !!  मैत्रीचे बळ माया प्रेम ते सुख तो आनंद पैशाने विकत घेता येणार नाही कधीही.


कोणतेही नातं टिकते ते विश्वासावर.. मैत्रीत आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. कारण आपल्याला विश्वास असतो की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवलाय तो मित्र आपल्या भल्याचाच विचार करत असतो.

एक दुसऱ्यापासुन लांब असुनही सर्वात जवळ असते ती मैत्री.. मित्र.. मित्रत्व...

निस्वार्थीपणे निभावलेली मैत्री अनंत काळ टिकते. कोणतेही अपेक्षा नसते आपली या नात्यात.

स्वार्थासाठी काही मिळविण्यासाठी कधीही मैत्री नसावी. जिव लावुन मैत्री निभावुन पहा जगातले सगळे सुख आनंद तुम्हाला मिळेल, सर्वात सुखी असाल तुम्ही.


मैत्री मन पाहुन केली जाते, चेहरा पाहुन नाही होत. मैत्रीच्या नात्यात  वयाचं बंधन नसतं. मैत्री कुणाशीही होवु शकते , वय लागत नाही मन लागतं.  मनातील भावना  बहरत जातील तर नातं जुळत जातं घट्ट.


मैत्रीचा थांग कधीही लागणार नाही. तो जिवाभावाच्या भावनांचा आणि विश्वासाचा

मायेचा सुखाचा प्रेमाचा 

अथांग सागर आहे...


जगात अनेक नाती आहेत.

समाज यापुढेही अनेक नाती 

गोती निर्माण करेल ..

मात्र मैत्री हेच नातं नितळ पवित्र आणि श्रेष्ठ आही आणि राहील.

..................................... 

©लेखिका : - गौरी धुरी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.