मुलगी

    मुलगी हा शब्द ऐकायला उच्चारायला नेहमीच छान वाटतं.

तुम्हा आम्हा सर्वांनाच माहित असलेला सर्वांच्याच ओळखीचा आणि जिव्हाळ्याचा हा शब्द. या शब्दात हळुवार प्रेमाचा वात्सल्याचा एक नाद ऐकू येतो. पण पूर्व आणि आजच्या या जगात  मुलगी म्हणजे परक्या घरचं धन समजल जातं. आजही मुलगी म्हटले की एक अस्वस्थ भावना निर्माण होते. अगदी या आधुनिक काळातही मुलगी म्हणजे बोज समजला जातो. मुलगी म्हणजे खुप खर्च म्ह्णून ती नकोशी जबाबदारी वाटते. 


तिच्या भावना तिची मते तिची स्वप्न याचा विचारच केला जात नाही. '' तू मुलगी आहेस शिकून तु पुढे काय करणार आहेस ? शेवटी तुला चुल व मुल च सांभाळायचे आहे..'' असं आजही म्हटले जात आहे. मग तीथेच तिच्या आकांक्षा इच्छा संपून जातात. तिला तिच्या स्वप्नाना भाव भावनाना मुरड घालावी लागते. 

जग झपाट्याने पुढे चालले आहे या जगाच्या गतीशी स्पर्धा करत मुलगी आज मुलांच्या खांद्याला खांधा मिळवुन आपले कर्तव्य करत आहे तरीही तीला कमी लेखले जाते. 

मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, पण मुलीला जास्त जीव लावला तरी ती दुसऱ्या घरीच निघुन जाणार ही भावना असते. मात्र आईवडीलासाठी खरा मायेचा उमाळा मुलीच्या हृदयातच असतो  तीच शेवटी धावुन येते त्यांच्यासाठी... शेवटी तीच खर निस्वार्थी प्रेम करते आपल्या कुटुंबावर. तिच्यातच असते आईची माया तीच आई बनुन येते तीच जपते त्याना शेवटी आई बनुन.

जन्मापासुनच तिच्यावर अनेक बंधने असतात, हे करु नको, ते कर, इथ जाउ नको तिथे जाउ नको , काळोख पडायच्या आत घरात ये.. रात्रि अपरात्री कुठे जाउ येउ नको... चारचौघात हासायचे नाही जास्त बोलायचे नाही.. कितीतरी बंधने... या मर्यादा आणि परंपरांचे ओझे झेलतच ती सहनशीलतेचा अंत होइपर्यंत सहन करत राहते.

मात्र यातील एकही बंधन मुलांसाठी नसते...


मुलीला एक संधी ध्या, एक मुक्तता ध्या, तीला आपली स्वप्ने पाहु दे ती स्वप्ने तीला जगु ध्या, तीला ती पूर्ण करु ध्या, तीच्या तरल आणि भव्य महत्वाकांक्षाना पंख लाभु दे , तीला उंच भरारी घेउ दे , तीला स्वतंत्रपणे तीच्या मनासारखे जगु दे.. पहा मग मुलगी काय करु शकते.. मग तीच्या भरारीला आभाळ ठेंगणे वाटेल......


खर तर तीला नेहमीच भय दाखवले जाते बाहेरील दुनियेचे.

दुनिया बरी नाही असे सांगितले जाते पण तीला ही दुनियादारी समजुन घ्यायला दिलं जात नाही. तिची दुनिया मात्र बंदिस्त चौकटीत कोंडली जाते. तीची घुसमट होत राहते मग नेहमीप्रमाणेच...

संस्कार हे फक्त जणु मुलीवर करायचे असतात मुलांवर मात्र नाही. प्रत्येक मुलगी स्त्री ही आपली आई बहीण असते हे संस्कार जर मुलांवर खर्या अर्थाने झाले तर सर्व स्त्रिया मुली आपले कर्तव्य निर्भयपणे करु शकतात.


मुलीला सांगितले जाते की तीनं आपली हौस मौज आपल्या सासरी करायची, कारण ते म्हणे तीच खर घर असतं, असं सांगुन तीच्या कोवळ्या मनावर आघात केला जातो, जो माहेर चा अतूट बंध असतो तोच दुखावला जातो आणि तिही आतून दुखावते, तीळ तीळ तुटत राहते. खर तर ते तीच घर नसत ते सासरच असतं फक्त एका मुलीसाठी... पण सारं निमूटपणे ऐकत राहायचं आणि जगत राहायचं. 


जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुसऱ्याच्या मर्जीने जगायचं. लहानपणी आईवडीलांची बंधने आणि लग्न झाल्यावर सासरच्या अत्यंत बंदिस्त चौकटीतील बंधने.. 

तीनं स्वतासाठी स्वताचं कधी जगायचं ? 

मुलगी नको असते पण प्रत्येकाला सुन हवी असते. 

परंपरांच्या या जोखडात मुलगी म्हणून जन्म घेणं , तो निभावण इतकं सोपं नसतं... 

सारं काही सोसुन कर्तव्ये आणि जबाबदारी पार पाडुन आतुन तुटत चेहऱ्यावर कायम हसु ठेवत जगणं सोपं आहे ?

मुलगी होणं सोपं आहे ?


तीच्या मनाचा वेदनांचा थांग कधी लागेल का ?


                                                                                                          लेखिका :  गौरी धुरी.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.